फलटण तालुक्यात 'सेवा हक्क दिन' उत्साहात; एका महिन्यात ६५ हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वाटप;



फलटण:[प्रतिनिधी] महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज, २८ एप्रिल २०२६ रोजी फलटण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये 'सेवा हक्क दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभांमध्ये कायद्यातील तरतुदींचे वाचन करून नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यात आली.

प्रशासन झाले 'हायटेक'; क्यूआर कोडद्वारे मिळणार माहिती

सेवा हक्क दिनानिमित्त तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये माहिती फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांना कोणत्या सेवा मिळतात आणि त्यासाठी किती शुल्क आकारले जाते, याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रशासनाने क्यूआर कोड (QR Code) प्रणाली कार्यान्वित केली असून, त्याद्वारे शुल्काची पारदर्शक माहिती मिळणार आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून या कायद्याचा प्रसार करण्यात आला.

प्रशासनाने गेल्या महिन्याभरात केलेल्या कामाचा आढावा प्रसिद्धीपत्रकाद्वारे सादर केला आहे. १ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत महसूल विभागामार्फत विक्रमी संख्येने दाखले देण्यात आले.

उत्पन्न प्रमाणपत्र ३२,८७७

अधिवास-राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ९,६१३

जात प्रमाणपत्र १०,४०७

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र ८,७६५

इतर (EWS, अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक इ.) ३,६७३

एकूण वितरित प्रमाणपत्रे ६५,३३५

एका महिन्यात ६५,३३५ दाखल्यांचे वाटप करण्यात आले .विशेष बाब म्हणजे, हे सर्व दाखले विहित मुदतीपेक्षाही कमी कालावधीत देऊन नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

तक्रार निवारण आणि आवाहन!

शासकीय सेवा मिळवताना नागरिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जर एखाद्या नागरिकाला विहित मुदतीत सेवा मिळाली नाही,ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैशांची मागणी झाली,किंवा सेवेबाबत काही तक्रार असल्यास,अशा वेळी नागरिकांनी त्वरित सेवा हक्क अधिनियमानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करावे, असे आवाहन फलटण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सर्व ऑनलाइन सेवा 'आपले सरकार' सेवा केंद्रांमार्फत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या