अनिल वीर
सातारा, दि.२८: — छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून साताऱ्यात वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जोरदार आंदोलन करत आमदार संजय गायकवाड आणि जितेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या सार्वजनिक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाचा भाग म्हणून साताऱ्यात सायंकाळी ५.३० वाजता जाहीर वाचन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावून वाद निर्माण केला असून, त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संदर्भहीन व चुकीची विधाने केल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली.
घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते सुहास पुजारी यांच्या हस्ते पुस्तकाचे वाचन करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर यावा, यासाठीच हे आंदोलन आहे,” असे मत माजी उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात श्रिरंग वाघमारे, सुधाकर काकडे, रमेश गायकवाड, सुनिल निकाळजे, वसंत खरात, बबनराव माने, विजय निकम, अंकुश धाईंजे, संजय कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज