" फलटण नगर परिषदेच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार: प्रभाग ३ मधील अपूर्ण आरसीसी गटार ठरतोय 'मृत्यूचा सापळा' ; बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत!!"



फलटण[प्रतिनिधी]: दि.23 एप्रिल 2026,

फलटण नगरपरिषदेचा कारभार किती निष्काळजी आहे, याचे जिवंत आणि धक्कादायक उदाहरण प्रभाग क्रमांक ३ मंगळवार पेठ मध्ये पाहायला मिळत आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील मंजूर योजनेचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने, या परिसरातील मुख्य रस्ता आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अक्षरशः 'मृत्यूचा सापळा' बनला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

प्रभाग क्रमांक ३ मध्ये आरसीसी गटाराचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम अर्धवट सोडून देण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गटाराचे काम पूर्ण झालेले नाही, लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत आणि मोठा खड्डा उघडा असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

जीवघेणा रस्ता आणि प्रशासनाची झोप:

हा रस्ता स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे येथे लोकांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे, या मार्गावर लहान मुले खेळत असतात. रात्रीच्या वेळी तर येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकी गंभीर परिस्थिती असूनही प्रशासन 'कुंभकर्णी झोपेत' का आहे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

अभियंत्यांची कबुली पण कामाचा पत्ता नाही!

या संदर्भात स्थापत्य अभियंता श्री. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे काम अपूर्ण असल्याची कबुली दिली आहे. काम मंजूर होऊन वर्ष उलटून गेले तरी ते पूर्ण का झाले नाही? यामागे कोणाचे 'हितसंबंध' आहेत? की ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

नागरिकांचा सवाल:

"आम्ही आमचा जीव मुठीत धरून इथे राहतोय.  नगर परिषद प्रशासन जाणून बुजून दलित वस्त्यामधील विकासकाम अर्धवट ठेवतय का? जर एखाद्या लहान मुलाचा किंवा वृद्धाचा या उघड्या गटारात पडून अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?" अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

 फलटणचे मुख्याधिकारी श्री.निखिल जाधव यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे,अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या