फलटण (प्रतिनिधी): दि.17 एप्रिल 2026,
बु.माजी नगरसेवक गणेश शांताराम अहिवळे यांच्या ८ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून, ठाकुरकी (गोळेगाव), ता. फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित 'मूक-बधिर विद्यालया'त भव्य अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. अहिवळे कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवून गणेश दादांच्या स्मृती जपल्या जातात.
१७ एप्रिल हा गणेश अहिवळे यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी विद्यालयातील मुलांसाठी भोजन व अन्नदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड अन्नाचे वाटप करण्यात आले.अहिवळे कुटुंबीयांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत, कोणत्याही डामडौलापेक्षा गरजूंना आणि दिव्यांग मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, अहिवळे कुटुंबीय आणि कामगार संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव गायकवाड (आप्पा), सातारा जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवळे, बौद्धाचार्य चिमण मोहिते, ॲड. शरद काकडे, अनिकेत अहिवळे, व इतर कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. " बु.गणेश दादांचे कार्य आणि आठवणी आजही आमच्या हृदयात कायम आहेत, त्यांच्या कार्याचा वारसा असाच पुढे सुरू ठेवू," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
विद्यालयातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी अहिवळे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. गणेश दादांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज