बारामती ,दि.८-: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे घडलेल्या हृदयस्पर्शी घटनेने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एका लेकीने धैर्याने अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारत स्त्री-पुरुष समानतेचा ठोस संदेश दिला आहे.
कर्नलवाडी येथील सुभाष दादासाहेब निगडे यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलती एक मुलगी उत्कर्षा असा परिवार आहे. दुःखाच्या या प्रसंगीही खचून न जाता उत्कर्षाने स्वतः वडिलांचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
परंपरेनुसार हिंदू धर्मात अंत्यविधी मुलाकडून केला जातो. मात्र निगडे कुटुंबाने ही परंपरा मोडीत काढत मुलीनेच अंत्यविधी करावा असा निर्णय घेतला. या कृतीतून समाजात नव्या विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली.
बारामती येथील वैकुंठ स्मशानभूमीत उत्कर्षाने अत्यंत शांतपणे व संयमाने सर्व विधी पूर्ण केले. “माझ्या वडिलांनी मला कधीच मुलापेक्षा कमी मानले नाही. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासात कर्तव्य पार पाडणे हा माझा हक्क आहे,” अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.
या निर्णयामागे कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता. कठीण प्रसंगी मुलीच्या पाठीशी उभे राहत त्यांनीही समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवले. या घटनेमुळे परिसरात कौतुकाची लाट उसळली असून अनेकांनी या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे.
कर्नलवाडीतील या घटनेने ‘लेकच खरा आधार’ ही भावना पुन्हा अधोरेखित करत समाजात स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश दिला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज