भोंदू बाबांवर कारवाईची मागणी; अंनिस आक्रमक!



अनिल वीर 

सातारा,२- : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे जिल्ह्यात वाढत्या भोंदूगिरीविरोधात ठोस भूमिका घेत भोंदू बाबांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः कथित भोंदू अशोक खरात बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये प्रभावी कारवाई करावी, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.


अंनिसने दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जिल्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व भोंदू बाबांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा विरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी, यासाठी हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.


या वेळी अंनिसच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रमोदिनी मंडपे, राज्य सहकार्यवाह भगवान रणदिवे, वार्तापत्र विभाग सहकार्यवाह प्रकाश खटावकर, बंधुत्व पुरस्कार विजेते व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने, राज्य कार्यवाहक वंदना माने आणि उदय चव्हाण उपस्थित होते.


 अंनिसच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील भोंदूगिरीविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या