कष्टकरी कुटुंबातील लेकीचा झंझावाती यशप्रवास; साक्षी मोरेची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड



विशाल मैराळे

चाळीसगाव ,दि.१७-: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाई आज यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील कन्या कु. साक्षी बाळू मोरे हिची मुंबई लोहमार्ग पोलीस (GRP Mumbai) पदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून साक्षीने मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

गुणवत्तेच्या जोरावर 'ओपन' प्रवर्गातून बाजी साक्षी मोरे हिने आपले बी.एस्सी. (B.Sc) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, तिने केवळ आपल्या प्रवर्गातूनच (SC) नव्हे, तर स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर 'ओपन' (UR - Unreserved) प्रवर्गातून मेरीटमध्ये स्थान मिळवून आपली क्षमता सिद्ध केली आहे. "आम्ही केवळ राखीव जागांवर अवलंबून न राहता, खुल्या प्रवर्गातूनही यश खेचून आणू शकतो," हे साक्षीने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.कष्टकरी पालकांच्या कष्टाचे चीज साक्षीचे वडील बाळू चिंतामण मोरे हे ड्रायव्हर आहेत. तर आई प्रमिलाबाई बाळू मोरे या मोलमजुरी करून घराला हातभार लावतात. आई-वडिलांनी अत्यंत कष्टातून साक्षीला शिक्षण दिले. आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मोरे दांपत्याचे स्वप्न आज साक्षीने सत्यात उतरवले आहे. साक्षीचा भाऊ स्वप्निल बाळू मोरे हा देखील सध्या मुंबई येथे एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी करत आहे.गावात आनंदाचे वातावरण साक्षीच्या या यशाची बातमी रांजणगाव आणि परिसरात समजताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीने थेट मुंबई पोलीस दलात वर्दी मिळवल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. साक्षीच्या या यशाने ग्रामीण भागातील इतर विद्यार्थिनींनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या