डॉ.निकम यांचेवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पांडुरंग अहिवळे यांची मागणी; तहसीलदारांचे पोलिसांना चौकशीचे आदेश

 

फलटण (प्रतिनिधी): दि.09 एप्रिल 2026

विक्रम गॅस एजन्सीच्या मालकाचा मुलगा डॉ. निकम यांनी बौद्ध समाजाबद्दल अवमानकारक विधान केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्याने आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आला.

             राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी विक्रम गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने नागरिक तक्रार करत होते. यावेळी उपस्थित असलेल्या डॉ. निकम यांनी "मंगळवार पेठेतील लोक एजन्सीची गाडी अडवून गॅस सिलिंडर ओढतात" असे विधान केले. मंगळवार पेठ हा प्रामुख्याने बौद्ध समाज बांधवांचा भाग असून, जाणीवपूर्वक समाजाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे विधान केल्याचा आरोप अहिवळे यांनी केला आहे.

तहसीलदारांचे पोलिसांना पत्र!

  या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तहसीलदार फलटण यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, "पांडुरंग अहिवळे हे ८ एप्रिल रोजी उपोषणास बसणार आहेत. तरी या अर्जाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर नियमानुसार योग्य ती चौकशी करून अर्जदारांना उपोषणापासून परावृत्त करावे व केलेल्या कारवाईचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करावा."

उपोषण स्थगित, पण लढाई सुरूच!!

            प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आणि पोलीस चौकशीच्या आश्वासनानंतर आजचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पांडुरंग अहिवळे यांनी स्पष्ट केले आहे की, डॉ. निकम यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जर पोलिसांनी योग्य चौकशी करून तातडीने कारवाई केली नाही, तर पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण छेडले जाईल.

या आंदोलनामुळे फलटण शहरात मोठी खळबळ उडाली असून, आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या