बिलोली,दि.१०-: प्रतिनिधी | विलास शेरे
नांदेड शहरात वाढत्या गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठला असून गॅंगवार, खून आणि अवैध धंद्यांनी शहराला वेढा घातला आहे. गेल्या ७० तासांत तब्बल ५ खून झाल्याच्या धक्कादायक घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नांदेडमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून अल्पवयीन मुलांच्या गॅंग तयार होत आहेत. विशेष म्हणजे काही गँगस्टर जेलमध्ये राहून बाहेरच्या टोळ्यांचे संचालन करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी दहशतीखाली जीवन जगत आहेत.
शहरात काळ्या काचा लावलेल्या चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. विशेषतः रात्री ९.३० नंतर अशा वाहनांची संख्या वाढते. या वाहनांमधील व्यक्तींची ओळख पटत नसल्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांसमोरून उघडपणे नियमभंग होत असतानाही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
मोटार वाहन कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ब्लॅक फिल्म पूर्णतः बंदी असूनही शहरात सर्रास वापर होत आहे. समोरील काच ७०% व बाजूच्या काचा ५०% दृश्यता अनिवार्य असतानाही नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
नांदेड हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात असले तरी वाढत्या गुन्हेगारीमुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. NEET, JEE साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याचा थेट परिणाम स्थानिक व्यवसाय, बाजारपेठ आणि गुंतवणुकीवर होत आहे.
शहरात गुटखा, दारू, मटका, वाळू तस्करी, वेश्याव्यवसाय, लूटमार, पाकिटमारी, शस्त्राच्या धाकावर गुन्हे अशा प्रकारांनी उच्छाद मांडला आहे. बेरोजगारीमुळे तरुणांचा गुन्हेगारीकडे ओढा वाढत असल्याचीही बाब समोर आली आहे.
वंचितच्या ठोस मागण्या
ब्लॅक फिल्म गाड्यांवर विशेष मोहीम व जप्ती
सर्व गँगवर कठोर कारवाई; मुख्य आरोपींना तात्काळ अटक
जेलमधून चालणारे नेटवर्क बंद करा
रात्री कडक नाकाबंदी व पोलीस गस्त वाढवा
अवैध धंदे तात्काळ बंद करा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करा
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी दिली. मात्र, जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग इंजि. राज अटकोरे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून या सर्व मुद्द्यांवर जोरदार भूमिका मांडली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज