ठाणे, दि.०१:- टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'प्रेसिडेंट कप इंडिया - २०२६' या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहात पार पडला. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना क्रीडा क्षेत्रात अशा प्रकारचे उपक्रम आयोजित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त देशभरातील एकूण १६ संघ ठाण्यात दाखल झाले असून, त्यांच्यातील सामने येत्या काळात रंगणार आहेत. ठाणेकरांच्या वतीने सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.
दादोजी कोंडदेव स्टेडियम क्रीडाप्रेमींनी खचाखच भरले होते. अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. यावेळी त्यांनी हलक्याफुलक्या शैलीत "क्रिकेट है तो विकेट है... मी देखील २०२२ साली एक मोठी विकेट काढली होती. आजही काही जण खेळण्याचा प्रयत्न करतात, पण माझी फिल्डिंग अजूनही टाईट आहे" असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रयत्नातून उभे राहिले असून ते ठाणे शहराची शान असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच या स्टेडियमच्या विकासासाठी आतापर्यंत ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमामुळे देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एक मोठे व्यासपीठ मिळणार असून, वर्षातून तीन वेळा विविध राज्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, डॉ. ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सूनंदन लेले, तसेच महाराष्ट्र झोन-०१चे अध्यक्ष अभिजित दरेकर, विविध संघांचे पदाधिकारी, खेळाडू आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज