सातारा SP तुषार दोशींच्या निलंबनावरून विधानपरिषदेत हायव्होल्टेज ड्रामा; सभापतींनी फिरवला उपसभापतींचा निर्णय!

 

[मुंबई]: दि.25 मार्च 2026 

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज विधानपरिषदेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेला निलंबनाचा आदेश अवघ्या काही तासांतच तालिका सभापती राम शिंदे यांनी रद्द केला आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

साताऱ्यातील एका जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला होता. यावर चर्चा सुरू असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कडक भूमिका घेत, "कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल सातारा SP तुषार दोशी यांना निलंबित करण्यात यावे," असे निर्देश सरकारला दिले होते.

सभापतींचा हस्तक्षेप आणि निर्णय रद्द!

उपसभापतींच्या या आदेशानंतर काही वेळातच सत्ताधारी पक्षाकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर तालिका सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाची पुनर्रचना करत नवा निर्णय जाहीर केला.

राम शिंदे यांचे स्पष्टीकरण: "कोणत्याही अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी नियमानुसार त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. थेट निलंबनाचा आदेश देणे प्रक्रियेला धरून नाही," असे नमूद करत शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांचा आदेश रद्द केला.

 तुषार दोशी यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत.

या सर्व प्रकरणावरून भाजप शिवसेनेची गळचेपी करतेय अशी चर्चा रंगू लागली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या