फलटण पोलीसांना अत्याधुनिक ‘सव्हिलन्स व्हॅन’ची जोड; वाहतूक नियंत्रण व बंदोबस्त अधिक सक्षम

 


फलटण, दि. २५ मार्च २०२६ : फलटण उपविभागीय पोलीस विभागांतर्गत एक अत्याधुनिक सुसज्ज ‘सव्हिलन्स व्हॅन’ दाखल करण्यात आली आहे. शहर व परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्ताची वाढती गरज लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन फलटण शहर पोलीस ठाण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले असून चारही बाजूंवर नजर ठेवता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हॅनमध्ये स्क्रीन बसवून सर्व कॅमेरे त्यास जोडण्यात आले असून त्यामुळे परिसरावर सतत नजर ठेवणे शक्य होणार आहे.

या सुसज्ज वाहनामध्ये प्राथमिक उपचार पेटी, ट्रॅफिक नियंत्रणासाठी आवश्यक साधने, आग विझविण्यासाठी फायर एक्स्टिंग्विशर तसेच अल्कोहोलिक पी.पी.एम. मीटर यांसारखी उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय अत्याधुनिक संप्रेषण यंत्रणा आणि P.A. सिस्टीममुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सूचना देणे अधिक सुलभ होणार आहे.

दि. २५ मार्च २०२६ रोजी मोटार परिवहन विभाग, सातारा येथील अधिकारी व अंमलदार यांनी या वाहनाच्या वापराबाबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

ही अत्याधुनिक व्हॅन उपलब्ध झाल्यामुळे फलटण पोलीस उपविभागाची कार्यक्षमता वाढणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डाॅ. वैशाली कडुकर मॅडम आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या