सातारा ,दि.३१-:प्रतिनिधी
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोन रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांना देताना मोठी चूक झाली. चुकीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना ही धक्कादायक बाब लक्षात आली. त्यानंतर नातेवाईकांनी संतप्त होत रुग्णालयात मोठा गोंधळ घातला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. “अशा गंभीर चुकीमुळे आमच्या भावनांचा खेळ झाला आहे. जबाबदारांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली.
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज