बीडमध्ये ‘अशोक खरात’पेक्षाही भयंकर प्रकार उघड ५ वर्षांत ९ भोंदू बाबांना बेड्या; अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक-मानसिक शोषण


बीड,दि.३१- : बीड जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, गेल्या पाच वर्षांत तब्बल ९ भोंदू बाबांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नाशिक येथील कुप्रसिद्ध अशोक खरात प्रकरणापेक्षाही गंभीर असल्याचे समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भोंदू बाबा स्वतःला दैवी शक्ती लाभलेली असल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत होते. “करणी झाली आहे”, “घरात दोष आहे” अशा प्रकारची भीती निर्माण करून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात होते. अनेकांनी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.


विशेषतः अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांना लक्ष्य करण्यात येत होते. “विशेष पूजा केल्यास मूल होईल” असे आमिष दाखवून महिलांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचे शोषण झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.


दरम्यान, पोलिस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त कारवाईत जिल्ह्यातील विविध भागांत छापे टाकण्यात आले. वाढत्या तक्रारींची दखल घेत कडक पावले उचलत ५ वर्षांत ९ भोंदू बाबांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला मोठा आळा बसल्याचे सांगितले जात आहे.


या प्रकरणातील आरोपींविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीला बळी न पडता कोणतीही संशयास्पद बाब त्वरित पोलिसांना कळवावी, तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी वैद्यकीय उपचारांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या