मुंबई,दि.३१- : बाप-लेकीच्या नात्याची ताकद काय असते, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून अक्षरशः नवजीवन दिले आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पार पडलेली ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून, सध्या पिता आणि कन्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
गेल्या काही वर्षांपासून विजय शिवतारे किडनीविकाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. परिस्थिती गंभीर होत असताना, मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनी पुढाकार घेत स्वतःची किडनी दान करण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे एका वडिलांना नवसंजीवनी मिळाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेने डॉ. ममता शिवतारे यांचे पती आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पत्नीबद्दल भावना व्यक्त करत एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. “आयुष्यात अनेक संकटांना सामोरे गेलो, पण पत्नीच्या या एका निर्णयाने मला आतून हादरवून सोडले,” असे त्यांनी नमूद केले.
लांडे यांनी पुढे लिहिले की, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत डझनभर वैद्यकीय तपासण्या, कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची जुळवाजुळव हे सर्व डॉ. ममता यांनी एकट्याने सांभाळले. “हे सगळं पाहताना देवाने मुलीला का घडवलं, याचं उत्तर मला मिळालं,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.
किडनी प्रत्यारोपणानंतर आयसीयू मध्ये पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहताना आपले अश्रू अनावर झाल्याचेही त्यांनी सांगितले. “जीवन-मरणाच्या संघर्षात अनेक नाती साथ सोडतात, पण मुलगी मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून बापासाठी उभी राहते,” असा मार्मिक संदेश त्यांनी आपल्या पोस्ट मधून दिला आहे.
या घटनेमुळे समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा वर्षाव होत असून, बाप-लेकीच्या या नात्याचा आदर्श अनेकांसमोर उभा राहिला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज