सांगलीत प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड! संजय नगरमध्ये अर्धवट नाला कामामुळे नागरिक त्रस्त, ७ महिन्यांपासून रखडले काम; घरात घुसते पाणी, नागरिकांचा संताप उफाळला

🚨 अपूर्ण कामावर बिल काढण्याचा आरोप; संबंधितांवर कारवाईची मागणी






सांगली,दि.२९- : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील संजय नगर (वार्ड क्र. 11) येथे सुरू करण्यात आलेले शिडी वर्क नाल्याचे काम तब्बल सात महिन्यांपासून अर्धवट अवस्थेतच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


सदर नाल्याचे काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व डबरे तयार झाले आहेत. याशिवाय गटारीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने आणि त्यावर मुतारीचे अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी, साचलेले पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने संजय नगर पत्रा चाळ परिसरातील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.


या परिस्थितीत गटारी साफ करताना महापालिका कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, एवढा गंभीर प्रश्न असतानाही गेल्या सात महिन्यांत महापालिका प्रशासन किंवा संबंधित नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


दरम्यान, अपूर्ण काम असतानाही संबंधित कामाचे बिल काढण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून, यामुळे भ्रष्टाचाराचा संशयही व्यक्त केला जात आहे.


या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. मिलिंद विष्णू साबळे यांनी महापौरांकडे अधिकृत तक्रार दाखल करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून काम पूर्ण करण्याबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नागरिकांचा प्रश्न असा आहे की, “काम अर्धवट ठेवून फक्त बिल काढण्याची घाई का?” आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, की नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या