नवतेजस्विनी महोत्सव : महिला बचत गटांच्या उत्पादनांचा भव्य मेळावा २३ ते २५ मार्चदरम्यान

 


सोलापूर, दि. २२ — महिला आर्थिक विकास महामंडळ (मावीम), जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने मावीमच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “नवतेजस्विनी महोत्सव” या नावाने महिला बचत गटांच्या उत्पादनांचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दि. २३ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत यशराज लॉन्स, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर येथे होणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माविम पुणे विभागाचे विभागीय अधिकारी विलास बच्चे, विभागीय व्यवसाय सल्लागार सिद्धराम माशाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवसीय महोत्सवात महिला बचत गटांचा सन्मान समारंभ, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध विषयांवरील चर्चा सत्रे, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुमारे ६० ते ७० महिला बचत गटांचे स्टॉल उभारले जाणार आहेत.

प्रदर्शनात घरगुती मसाले, हळद पावडर, पापड, लोणची, शेवया, सांडगे, कुरडया, लाल व काळे तिखट, घाण्याचे तेल, दुग्धजन्य पदार्थ, ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या, सोलापुरी शेंगदाणा चटणी, लाडू, चिवडा, विविध धान्ये तसेच हस्तकला साहित्य, कपडे, बॅगा, इमिटेशन दागिने आणि सौंदर्य प्रसाधने यांचा समावेश असणार आहे.

तसेच माविम अंतर्गत स्थापन महिला शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत सेंद्रिय भाजीपाला, फळे, कडधान्ये, ज्वारी, बाजरी, मका, सेंद्रिय गूळ, मध, मोरिंगा पावडर आदी उत्पादनेही उपलब्ध असतील. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही आकर्षण ठरणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या