तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा आणि कु-हाड पोलिसांच्या ताब्यात; जूनपासून ४ अग्निशस्त्रे व १२ हत्यारे जप्त
बारामती,दि.१९- : बारामती तालुक्यातील मौजे बारवनगर गावच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा आणि कु-हाड अशी एकूण सात घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी दादा नथुराम शिंदे (रा. बारवनगर, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता बारवनगर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या राहत्या घरासमोरील परिसरात ही शस्त्रे आढळून आली. सदर शस्त्रे बाळगण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५४/२०२६, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ₹५०० किमतीची स्टीलची तलवार, ₹४०० किमतीची लोखंडी तलवार, ₹२०० किमतीची स्टीलची तलवार, ₹१०० किमतीचा लोखंडी कोयता, ₹२०० किमतीचा लोखंडी सत्तुर, ₹१०० किमतीचा लोखंडी सुरा आणि ₹१०० किमतीची लोखंडी पाते असलेली कु-हाड यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ₹१,६०० इतकी आहे.
माळेगाव पोलीस ठाणे हद्दीत जून २०२६ पासून शस्त्रविरोधी कारवायांना वेग आला असून, पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत ४ अग्निशस्त्रे आणि १२ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या कारवायांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल करून १३ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते तसेच पोलीस अंमलदार अजय अवघडे, वैभव मोहोळकर, विजय वाघमोडे, महेश पठारे, ज्ञानेश्वर मोरे, राजू शिंदे, अमोल वाघमारे आणि सागर पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज