माळेगावात घरासमोरील कंपाउंडवर ट्रॅक्टर घालून तोडफोड; विरोध करणाऱ्या कुटुंबावर दगडफेक व मारहाण! पाच जणांना अटक

शिवनगर येथील धक्कादायक प्रकार; ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा फिर्यादीचा आरोप, माळेगाव पोलिसांत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल



माळेगाव,दि.१९- :माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर येथे घरासमोरील सिमेंटच्या विटांच्या कंपाउंडची परवानगीशिवाय ट्रॅक्टरच्या साहाय्याने तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना दगडाने व हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता माळेगाव, शिवनगर येथे घडली. फिर्यादी अविनाश बाळकृष्ण नरूटे यांच्या घरासमोरील मालकीच्या सिमेंटच्या विटांच्या कंपाउंडची आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता तोडफोड केल्याचा आरोप आहे.


फिर्यादीनुसार, आरोपी रणजीत लालासो ढोले हा नंबर नसलेला ट्रॅक्टर घेऊन आला. ट्रॅक्टरच्या पुढील लोखंडी फरांडीने कंपाउंडला वारंवार धडक देत ते पाडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


कंपाउंडची तोडफोड थांबविण्यासाठी फिर्यादी अविनाश नरूटे व त्यांचा भाऊ नंदकिशोर हे पुढे गेले असता, रणजीत ढोले याने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे मोठी दुखापत होण्याची किंवा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


यानंतर सुजित लालासो ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले यांनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी तसेच त्यांचे भाऊ नंदकिशोर, वडील बाळकृष्ण आणि आई सुजाता यांना दगडाने व हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.


या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 253/2026 अन्वये BNS कलम 110, 118(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3.48 वाजता करण्यात आली.


या प्रकरणातील आरोपी रणजीत लालासो ढोले, सुजित लालासो ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले यांना पोलिसांनी अटक केली आहे.


गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार लोंढे (ब.नं. 2420) यांनी केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत. कंपाउंडची तोडफोड, ट्रॅक्टरचा वापर आणि मारहाणीच्या आरोपांबाबत तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या