कुपवाडमधील सि.स. नं. ७७४ वाद चिघळला; आंबेडकर पुतळ्याला विलंब, ‘स्मृती उद्याना’वरून संशयाचे सावट



प्रतिनिधी

सांगली,दि.२४ - : कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील महानगरपालिकेच्या सि.स. नं. ७७४ या खुल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात असताना, त्याच ठिकाणी अचानक ‘कै. आमदार शरद पाटील स्मृती उद्यान’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


आमदार कै. शरद पाटील यांच्या स्मृती उद्यानाला कोणताही विरोध नसून, ते अन्य योग्य ठिकाणी उभारण्यात यावे, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र, आंबेडकर पुतळ्यासाठी मागणी असलेल्या याच भूखंडावर स्मृती उद्यानाचा प्रस्ताव आणण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे.


महानगरपालिका महासभेने यापूर्वी या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने १ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आले होते.


मात्र, या मागणीवर ठोस निर्णय होण्याआधीच उपमहापौरांनी स्वतंत्रपणे ‘कै. आमदार शरद पाटील स्मृती उद्यान’चा प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीत ऐनवेळचा विषय म्हणून प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकाच भूखंडासंदर्भात वेगवेगळे निर्णय आणि प्रस्ताव समोर आल्याने प्रशासनिक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


‘आंबेडकर पुतळा टाळण्यासाठीच हा डाव?’


बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आंबेडकर पुतळा उभारणीचा मुद्दा बाजूला सारण्यासाठीच स्मृती उद्यानाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा केवळ विकासाचा प्रश्न नसून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि बहुजन समाजाच्या अस्मितेशी संबंधित विषय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.


दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर, उपमहापौर तसेच इतर नगरसेवकांनी आंदोलकांना सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांनी हा विषय महासभेत मांडण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी कायम आहे.


आंदोलकांनी स्पष्ट भूमिका घेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित भूखंडावर कोणतेही भूमिपूजन, उद्घाटन किंवा विकासकाम सुरू करू नये, अशी मागणी केली आहे. तसेच संपूर्ण निर्णय प्रक्रियेची चौकशी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.


पालकमंत्री, खासदारांकडे निवेदन


या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कुपवाडच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, क्रांती कांबळे, युवराज कांबळे, हिरामण भगत, विवेक तोरवे, गौतम भगत, अनिल मोरे, रूपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बाबासाहेब कांबळे, अशोक लोंढे, वैभव रांजणे, ॲड. श्रीनाथ कांबळे, सागर सावंत, विनायक मोरे, सागर खंडागळे, नविनकुमार कांबळे, अशोक भटकर, सरिता दयानंद कांबळे, जया भगत, शितल कोलप, सुरेखा बळखंडे, नंदकिशोर शिंदे यांच्यासह फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते.


आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


सि.स. नं. ७७४ या भूखंडाचा प्रश्न आता प्रशासनिक निर्णयापुरता मर्यादित राहिलेला नसून, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांशी जोडला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेत सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून पारदर्शक आणि कायदेशीर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीबाबत ठोस निर्णय न झाल्यास फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि बहुजन समाजाच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुपवाडमधील या संवेदनशील प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या