फलटण: चायनीज मांजात अडकलेल्या गव्हाणी घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमने दिले जीवनदान !

 

फलटण (प्रतिनिधी):

घातक चायनीज मांजा पक्षांच्या आणि मानवाच्या जिवावर उठल्याच्या घटना वारंवार घडत असतानाच, फलटण येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस (अधिकार गृह परिसरात) एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली. पतंग उडवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजामध्ये अडकून एक 'गव्हाणी घुबड' (Barn Owl) झाडावर जीवघेण्या अवस्थेत लटकत होते. मात्र, मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमच्या खेळाडूंनी प्रसंगावधान दाखवत या घुबडाची सुटका करून त्याला जीवनदान दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयामागील परिसरात एका मोठ्या झाडावर चायनीज मांजा अडकलेला होता. या मांजात गव्हाणी घुबड वाईट रीतीने अडकल्याचे तेथून जाणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास आले. मांजा पायात आणि पंखात गुंफल्यामुळे घुबडाला हालचाल करणेही अशक्य झाले होते. मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमच्या खेळाडूंनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने झाडावरून त्या घुबडाला खाली उतरवले आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याच्या शरीराला गुंडाळलेला प्राणघातक मांजा कापून त्याची मुक्तता केली.

या यशस्वी बचावकार्यानंतर 'नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, फलटण' (Nature and Wildlife Welfare Society, Phaltan) च्या वतीने मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमच्या सर्व खेळाडूंचे विशेष आभार मानण्यात आले व त्यांच्या या सामाजिक आणि पक्षीप्रेमी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

चायनीज मांजा आणखी किती प्राण्यांचा जीव घेणार?

प्रतिबंध असूनही सर्रास वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजामुळे आजवर असंख्य मुक्या पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने यात अडकलेले पक्षी तडफडून मरतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून, नागरिकांनीही आपल्या सभोवतालच्या परिसरात, लहान मुलांना तसेच तरुणांना चायनीज मांजा न वापरण्याबाबत प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांच्या जागरूकतेनेच ही मूक प्राण्यांची होणारी जीवितहानी थांबवता येणे शक्य होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या