मंगळवार पेठेत उकाड्याचा कहर: वायरमनचा फोन बंद, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे भविष्य 'टांगणीला'!

फलटण:[प्रतिनिधी] दि.13 एप्रिल 2026

 एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, अशा दुहेरी कात्रीत मंगळवार पेठ वॉर्ड क्रमांक ३ मधील नागरिक अडकले आहेत. दुपारी १ वाजल्यापासून वीज गायब झाल्याने आणि जबाबदार वायरमनने चक्क आपला मोबाईल बंद करून ठेवल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला;

सध्या ५ वी ते ७ वीच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. बाहेर ३९ अंश सेल्सिअस तापमानाचा पारा चढलेला असताना, घरात घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीत लहान मुलांनी अभ्यास कसा करायचा? वीज नसल्याने अभ्यासाचे नियोजन कोलमडले असून महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

वायरमनचा 'मोबाईल बंद' पॅटर्न!

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ऐन आणीबाणीच्या वेळी मदतीला धावून येण्याऐवजी या प्रभागासाठी नेमलेल्या वायरमनने आपला मोबाईल बंद (Switch Off) करून ठेवला आहे. 'पगार जनतेच्या पैशातून घ्यायचा आणि संकटकाळात गायब व्हायचे' हा कोणता न्याय? असा सवाल नागरिक करत आहेत.

सध्या सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या उत्सवासाठी मंगळवार पेठेत बाहेरगावाहून शेकडो पाहुणे आले आहेत. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात वीज खंडित झाल्याने 'अतिथी देवो भव' म्हणणाऱ्या पेठकरांची पाहुण्यांसमोर मोठी नाचक्की होत आहे. घराघरात पाहुणे असताना अंधारात आणि उकाड्यात त्यांचे स्वागत कसे करायचे, असा प्रश्न महिलावर्गातून विचारला जात आहे.

"एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे जयंतीचा मोठा सण, अशावेळी महावितरणने सतर्क राहणे गरजेचे होते. जर वायरमन फोन उचलणार नसतील, तर मग आम्ही तक्रार कोणाकडे करायची? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या 'विश्रांती' घेणाऱ्या वायरमनची कानउघाडणी करावी आणि तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा."

  जर पुढील काही तासांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही आणि अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर संतप्त नागरिक महावितरण कार्यालयावर धडक देण्याच्या तयारीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या