कागदावर 100% पाणी, प्रत्यक्षात जनता तहानलेली!” दुधेभावी गावात पाणी घोटाळा; नाला फोडून पाण्याची चोरी, प्रशासन झोपेत?


कवठेमंकाळ (सांगली) : प्रतिनिधी

दि.१२/०४/२०२६

सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेभावी गावात पाणीपुरवठ्याबाबत मोठा गैरप्रकार उघडकीस येत असून, कागदोपत्री शंभर टक्के पाणीपुरवठा दाखवला जात असताना प्रत्यक्षात नागरिक आणि शेतकरी मात्र पाण्यासाठी तहानलेले असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.


गावातील “हजार बाय तलाव” येथून पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांकडून शुल्क आकारण्यात आले असतानाही तलावातील किंवा नाल्यातील पाणी जनतेसाठी सोडले जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


नाला फोडून पाणी वळवले; काहींचा मनमानी कारभार

यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही तिरायती व्यक्तींनी तलावाचा कडा व नाला बेकायदेशीररित्या फोडून पाणी चुकीच्या मार्गाने वळवण्यास सुरुवात केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे गावात वाद-विवाद, तणाव आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.


“पाणी सर्वांसाठी असताना काहीजण स्वतःच्या फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवत आहेत,” असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला.


पैसे भरूनही पाणी नाही; जनतेचा संताप अनावर

ग्रामस्थांनी पाणी मिळावे म्हणून पैसे भरले, तरीदेखील त्यांना पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “पैसे घेतले पण पाणी दिले नाही, हा सरळ सरळ घोटाळाच आहे,” असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.लोकप्रतिनिधींची उदासीनता; फक्त आश्वासनांची बरसात

या गंभीर प्रश्नावर स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही होत आहे. “जनतेला फक्त आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात कोणतीही कृती दिसत नाही,” अशी टीका स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

फौजदारी कारवाईची मागणी; अधिकाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार

या प्रकरणी संबंधित दोषींवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, तसेच ग्रामविकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.


संघटनेच्या वतीने या प्रकरणाचा तपास कवठेमंकाळ तालुकाध्यक्ष ऋषिकेश गडदे करत असून, महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद विष्णू साबळे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

“पाणी आमचा हक्क आहे, कुणाची मक्तेदारी नाही!”

दरम्यान, “पाणी हा आमचा हक्क आहे, कुणाच्याही बापाची मालमत्ता नाही,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला असून, लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या