श्रीराम एज्युकेशन सोसायटी व नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटणच्या मनमानी कारभाराविरुद्ध दोन प्राध्यापकांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बेमुदत उपोषण सुरू;


फलटण [प्रतिनिधी]: दि.27 एप्रिल 2026

 फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि नामदेवराव सूर्यवंशी (बेळके) महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात दोन प्राध्यापकांनी आज, २७ एप्रिल २०२६ पासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रा. डॉ. सतेज महादेव दणाणे आणि प्रा. डॉ. संदेश सोपानराव बिचुकले यांनी संस्थेच्या मनमानी कारभाराविरुद्ध हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

आंदोलनाची प्रमुख कारणे:

प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी खालील गंभीर मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही:

•नियमबाह्य प्रशासन: संस्था आणि महाविद्यालयाचा कारभार नियमांना धरून नसल्याचा आरोप.

•सेवेतील ज्येष्ठतेचे उल्लंघन: प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या नियमांचे जाणीवपूर्वक पायमल्ली.

•धमकावणूक: प्राध्यापकांना वेठीस धरण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचे गंभीर आरोप.

•बहिष्कृत वागणूक: महाविद्यालयाकडून प्राध्यापकांसोबत भेदभावपूर्ण आणि बहिष्कृत वागणूक दिली जात असल्याचे नमूद केले आहे.

वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष;

प्रा. डॉ. दणाणे आणि प्रा. डॉ. बिचुकले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही वारंवार महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठाशी पत्रव्यवहार करून आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रार केली होती. मात्र, कोणत्याही स्तरावर आमच्या अर्जांची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आम्हाला न्यायासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे." सदर उपोषणास बसलेल्या प्राध्यापकांना जर धमकी मिळत असेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे प्रशासनाने प्राध्यापकांना संरक्षण दिले पाहिजे, कारण विद्येचे ज्ञान देऊन एक चांगली पिढी घडवण्याचे महान व आदर्श कार्य करत असतात.  प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात जर  शिक्षकांवर अशी वेळ येत असेल तर ही चिंतेची आणि फार गंभीर बाब आहे.

   शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या या महाविद्यालयातील कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यापीठ प्रशासन या प्राध्यापकांच्या मागण्यांची तातडीने दखल कधी घेणार, आणि संबंधित महाविद्यालयावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या