फलटण (प्रतिनिधी): दिनांक 17 एप्रिल 2026,
शहरातील विकासकामांच्या नावाखाली रस्ते उकरून ठेवणे आणि त्यानंतर ती कामे वाऱ्यावर सोडून देणे, हा जणू फलटण नगर परिषदेचा पायंडाच पडला आहे. फलटणमधील 'संग्राम अहिवळे यांचे घर ते नितीन शिंदे यांचे घर' या भागातील पूर्व-पश्चिम गटाराचे आणि सिमेंट रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडलेले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आता थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात गटार आणि काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, केवळ अर्धवट काम करून ठेकेदाराने आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. गेल्या १८ महिन्यांपासून हा रस्ता खड्डेमय आणि चिखलमय झाला असून, गटाराचे पाणी साचल्याने दुर्गंधीचाही त्रास होत आहे.
अपघातांचे सत्र आणि 'पर्यायी रस्ता' नसल्याची अडचण;
या परिसरातील नागरिकांसाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि नोकरदारांना याच खराब रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या अपूर्ण कामामुळे आजवर अनेक किरकोळ अपघात झाले असून, काही नागरिक जखमीही झाले आहेत.दीड वर्ष उलटले तरीही कामाचा पत्ता नाही. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात काही 'साटेलोटे' आहे का? "एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?" असा संतापलेला सवाल आता नागरिक विचारत आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण आहे नगरपरिषदेने बिल मात्र काढले आहे का हे तपासावे लागेल? आणि नगर परिषद मधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कॉन्ट्रॅक्टरशी असणारे धागेदोरे आहेत का असा संशय येत आहे.सदर कामात नागरिकांकडून भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांनी दिला इशारा!
नितीन अशोक शिंदे, विरसेन रामदास सोनवणे, मनोज अर्जुन यादव, प्रसाद माणिक शिंदे आणि प्रकाश काशिनाथ शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षरी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. "हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज