केबल दुरुस्ती ठरली जीवघेणी! विजेच्या तीव्र धक्क्याने ४५ वर्षीय व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत




बारामती,दि.२-: तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, केबल दुरुस्ती करताना विजेचा जोरदार धक्का बसून ४५ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव परिसरात अलीकडे झालेल्या गारपिटीमुळे केबल सेवा विस्कळीत झाली होती. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी राहुल उर्फ पप्पू नारायण जगताप (वय ४५) हे दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले.


घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अनपेक्षित घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिकांकडून आणि सहकाऱ्यांकडून राहुल जगताप हे मेहनती व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


दरम्यान, अशा प्रकारच्या कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळल्या जाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानेही या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या