जुन्नर हादरले! जेवणात ‘पाल’ आढळली; २८ शेतमजूर रुग्णालयात दाखल


पुणे,दि.२५-: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कांदा काढणीसाठी आलेल्या शेतमजुरांच्या जेवणात चक्क मृत पाल आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असून तब्बल २८ मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शेती हंगाम जोरात सुरू असून मंगरूळ येथे कांदा काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर आले आहेत. दिवसभराच्या मेहनतीनंतर सर्व मजूर एकत्र बसून जेवण करत असताना एका मजुराच्या भाजीत मृत पाल आढळली. हा प्रकार लक्षात येताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


या घटनेनंतर काही वेळातच अनेक मजुरांना मळमळ, उलट्या, चक्कर यांसारखे त्रास जाणवू लागले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत सर्व बाधितांना बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.


सध्या सर्व २८ मजुरांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतमजुरांना दिले जाणारे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित असणे अत्यावश्यक असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या