फलटण/सातारा[प्रतिनिधी]: दि.27 मार्च 2026,
राजकारणात 'निष्ठा' हा शब्द आता केवळ भाषणांपुरता मर्यादित राहिला आहे की काय, असा प्रश्न पडण्यासारखी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला, आज त्याच निष्ठावंतांच्या नशिबी केवळ 'उपेक्षा' आली आहे. दुसरीकडे, कालपर्यंत ज्यांच्या विरोधात दंड थोपटले, तेच 'आयाराम-गयाराम' आज सत्तेच्या ताटावर बसून मलिदा खात आहेत.
# निष्ठेचा लिलाव आणि संधिसाधूंचा सुकाळ!
पिढ्यानपिढ्या एकाच विचारधारेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला आज स्वतःच्याच पक्षात 'उपरा' झाल्यासारखे वाटत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणारे नेते सत्ता मिळाल्यावर मात्र कार्यकर्त्याला विसरतात. नेत्यांनी पक्ष बदलला की ती 'राजकीय सोय' ठरते, पण कार्यकर्त्याला मात्र आजही निष्ठेच्या नावाखाली बांधून ठेवले जाते. आजच्या काळात ज्यांच्याकडे निष्ठा आहे, त्यांना संधी नाही; आणि ज्यांच्याकडे संधी आहे, त्यांच्याकडे कसलीच निष्ठा नाही, असे चित्र दिसत आहे.
कार्यकर्त्यांनो, आता 'संधीचं सोनं' करण्याची वेळ!
निष्ठावंत कार्यकर्त्याची तळमळ आता कोणाच्याही लक्षात येत नाहीये. त्यामुळेच, आता कार्यकर्त्यांनी सुद्धा केवळ भावनिक न होता 'व्यावहारिक' होणे गरजेचे आहे.
"नेते जर स्वतःच्या फायद्यासाठी रातोरात विचार आणि पक्ष बदलू शकतात, तर कार्यकर्त्यांनी तरी वर्षानुवर्षे फक्त सतरंज्या का उचलाव्यात? कार्यकर्त्यांनी सुद्धा आता आपली शक्ती ओळखली पाहिजे. केवळ नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा आपल्या भागातील विकास, स्वतःची प्रगती आणि राजकीय संधी कशा मिळतील, याचा विचार करून 'संधीचं सोनं' करायला शिकले पाहिजे."
हा लेख त्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आहे जो आजही प्रामाणिकपणे झेंडा धरून उभा आहे. पण लक्षात ठेवा, तुमची निष्ठा ही नेत्याची 'जहागीर' नाही. नेत्यांनी जर कामाचे, टेंडरचे किंवा सत्तेचे शब्द देऊन फिरवले असतील, तर कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या भविष्याचा विचार करणे चुकीचे नाही. राजकारणाच्या या गढूळ प्रवाहात आता 'स्वहित' जपणे ही काळाची गरज बनली आहे.
जोपर्यंत कार्यकर्ता स्वतःच्या हक्कासाठी उभा राहत नाही, तोपर्यंत त्याची 'चेष्टा' अशीच होत राहील. आयारामांचे फावत असताना निष्ठावंतांनी आता गप्प न बसता, राजकारणातील आपल्या अस्तित्वाचा आणि फायद्याचा विचार करून पावले उचलली पाहिजेत.
0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज