फलटण (शहर प्रतिनिधी): दि.26 मार्च 2026
फलटण शहरातील भारत गॅस एजन्सीकडून ग्राहकांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत, या एजन्सीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीचे फलटण तालुका उपाध्यक्ष सुनील राजाराम पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी फलटणचे तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
सुनील पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत गॅस एजन्सीकडून सर्वसामान्य ग्राहकांना गॅस पुरवठा करताना जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. अनेक ग्राहकांकडून गॅस सिलिंडरसाठी जादा पैशांची मागणी केली जाते, तसेच वेळेवर पुरवठा न करता लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लावून मानसिक त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फलटण तालुक्यातील जनतेला योग्य दरात आणि वेळेत गॅस सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, संबंधित एजन्सीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज