सातारा, दि.३१: — ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून साताऱ्यात सोमवारी आयोजित सभेत वातावरण चांगलेच तापले. ओबीसी नेते हाके यांनी आक्रमक भूमिका घेत “ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला गेला, तरी समाज अजूनही झोपेत आहे,” असा आरोप करत उपस्थितांना फटकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क होती. हाके आणि ससाणे यांचा ताफा पोहोचताच कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भाषणाच्या सुरुवातीलाच हाके यांनी ओबीसी समाजावरच टीका करत, “आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना समाज अपेक्षित प्रमाणात रस्त्यावर उतरत नाही,” अशी खंत व्यक्त केली. फलटण आणि साताऱ्यात अपेक्षित मोर्चे न निघाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आपल्या भाषणात त्यांनी महेश शिंदे यांचा उल्लेख करत त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसेच माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला.
हाके यांनी मराठा आंदोलनावरही टीका करत, “ओबीसींचे हक्क हिरावले जात असताना परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे,” असे म्हटले. सातारा जिल्हा परिषदेत ओबीसी समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करत, ओबीसी व बहुजन समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवल्याचे सांगितले.
सभेनंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत असून, राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज