मुंबई,दि.23- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह प्रकाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत उमटले. या घटनेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीबाबत त्यांनी सभागृहात संतप्त प्रतिक्रिया नोंदवत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली.
“लोकशाही प्रक्रियेदरम्यान लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे वागणूक दिली जाणे अत्यंत गंभीर आहे. ही केवळ व्यक्तीवरची नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवरची आघात आहे,” असे स्पष्ट करत देसाई यांनी जबाबदारी निश्चित करण्याचा ठाम आग्रह धरला. या प्रसंगी आमदार मकरंद पाटील, संजय खोडके आणि हेमंत पाटील यांनीही देसाई यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध नोंदवत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली.
घटनेची गांभीर्याने दखल घेत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने हस्तक्षेप करत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे प्रशासनाकडून या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री देसाई यांनी या कारवाईचे स्वागत करत, “ही कारवाई लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक होती. मात्र, केवळ निलंबनावर न थांबता संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे ठामपणे नमूद केले.
दरम्यान, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी देसाई यांनी केली.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज