राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची विशेष उपस्थिती,आश्रमाच्या सेवाकार्याची मान्यवरांकडून पहाणी.
पुणे ,दि.२२-: निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्यास देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचीही यावेळी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आश्रमातील विविध सेवाकार्यांची पाहणी केली. रुग्ण, कार्यकर्ते आणि व्यवस्थापनाशी संवाद साधत त्यांनी आश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच, या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते “आमच्या आनंदाचे रहस्य” या पुस्तकाचे प्रकाशन. हे पुस्तक केवळ वाचनापुरते मर्यादित नसून, सकारात्मक आणि संतुलित जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
निसर्गोपचार आश्रम हे केवळ उपचार केंद्र नसून निरोगी आणि आनंदी जीवनाची दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित या आश्रमाचे कार्य समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत आहे. गांधीजींच्या साध्या, नैसर्गिक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व आजच्या काळात अधिकच अधोरेखित झाले आहे.
“गावाकडे चला” हा गांधीजींचा संदेश आजही मार्गदर्शक ठरत असून, निसर्गाशी सुसंवाद साधत जीवन जगण्याची प्रेरणा या आश्रमातून मिळते. स्वच्छता, ध्यान आणि नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या निमित्ताने आश्रमाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजाला निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारे हे कार्य भविष्यातही अधिक व्यापक व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.





0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज