फलटण शहर व परिसरात लॉजच्या आडून चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाविरोधात भीम आर्मीने पुकारलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची अधिकृत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
भीम आर्मीचे फलटण तालुकाध्यक्ष अजित संभाजी मोरे यांनी ५ मार्च २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते. यात त्यांनी फलटणमधील काही लॉजेसवर महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा आरोप केला होता. वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने १५ मार्च रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाची कारवाई !
भीम आर्मीच्या या तक्रारीनंतर फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांनी संबंधित तक्रारीची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:
गुन्हा नोंद: फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३४/२०२५, २५६/२०२५ आणि ६४/२०२६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लावण्यात आलेली कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), १४४(२) आणि स्त्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रार अर्ज निकाली..
प्रशासनाने केलेल्या या ठोस कारवाईनंतर भीम आर्मीचा तक्रार अर्ज आता रेकॉर्डवर फाईल करण्यात आला असून, केलेल्या कारवाईची नोंद घेण्याबाबतचे 'समजपत्र' उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत अजित संभाजी मोरे यांना देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज