जम्मूत कर्तव्य बजावताना जवान अजित बागाव यांना वीरमरण

राजुरीचे सुपुत्र; ठाकूरकी-गोळेगाव परिसरावर शोककळा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



फलटण ,दि.२८-: भारतीय सैन्य दलात जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना फलटण तालुक्यातील राजुरीचे सुपुत्र जवान अजित बाळासाहेब बागाव यांना २६ सप्टेंबर रोजी वीरमरण आले. त्यांच्या निधनाची वार्ता समोर येताच राजुरीसह ठाकूरकी-गोळेगाव आणि संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली.


जवान अजित बागाव यांनी तब्बल १५ वर्षे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत देशसेवेचे कर्तव्य पार पाडले. जम्मू येथे कर्तव्यावर असतानाच त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी चारनंतर पुणे येथून फलटणकडे रवाना झाले. त्यानंतर ठाकूरकी-गोळेगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित बागाव यांच्या कुटुंबाला देशसेवेची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांचे वडील बाळासाहेब बागाव यांनी भारतीय सैन्यात तब्बल २२ वर्षे सेवा बजावली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित यांनीही आपल्या आयुष्यातील १५ वर्षे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली.


बागाव कुटुंबीय मूळचे राजुरी येथील असून, गेल्या १५ ते २० वर्षांपासून ते ठाकूरकी-गोळेगाव परिसरात वास्तव्यास आहेत. अजित यांच्या वीरमरणाची बातमी समजताच नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोकसंवेदना व्यक्त केली.


देशसेवेचे कर्तव्य बजावताना जवान अजित बागाव यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान संपूर्ण फलटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या त्यागाला नागरिकांकडून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या