वर्षानिमित्त कोट्यवधींच्या कामांसाठी राज्य सरकारकडून पाठपुराव्याचे आश्वासन
सातारा / प्रतिनिधी,दि.५-:रामदास आठवले यांनी रहिमतपूर येथील ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी खासदार निधीतून १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच उर्वरित कोट्यवधींची विकासकामे राज्य सरकारमार्फत पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समता स्तंभ सातारा जिल्हा शताब्दी महोत्सवानिमित्त रहिमतपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आठवले यांनी आपल्या खास शैलीत “ऐतिहासिक परिषदेची १०० वर्षे पूर्ण झाली म्हणूनच माझा मंत्रिमंडळात नंबर लागला,” असे विनोदी वक्तव्य करत उपस्थितांची दाद मिळवली.
ते पुढे म्हणाले की, “संविधान बदलाची चर्चा ही पूर्णपणे अफवा आहे. जर असा प्रयत्न झाला तर समाज तीव्र प्रतिक्रिया देईल.” तसेच समाज एकत्रित ठेवण्याचे काम सुरू असून सर्वांगीण विकासासाठी युवकांनी शिक्षण, राजकारण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मनोज घोरपडे यांनी बौद्ध-मातंग वस्तीच्या स्मशानभूमीसाठी शासनाकडून ५० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच समता स्तंभाच्या भूमिपूजनासाठी ६० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. रहिमतपूर येथील स्मारकासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी नमूद केले.
या शताब्दी महोत्सवात समता स्तंभास सामूहिक मानवंदना देण्यात आली. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच खरात गायन पार्टीतर्फे भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ मे १९२६ रोजी रहिमतपूर येथे वतनदारांची परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी बहिष्कृत व शोषित समाजाला मार्गदर्शन करत स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जतन करण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात.
यंदा या ऐतिहासिक परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे होत असल्याने रहिमतपूर नगरीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महामानवांच्या विचारांचा जागर करत कृतिशील अभिवादन करण्याची परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात आली.
कार्यक्रमास संविधान तज्ञ, व्याख्याते, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून वैशालीताई निलेश माने व केतन माने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज