छत्रपती संभाजीनगर , प्रतिनिधी,दि.२३-: सोशल मीडियावर व्यवस्थेविरोधात उपहासात्मक भूमिका मांडणाऱ्या “कॉक्रोच जनता पार्टी” या व्हायरल मोहिमेचे संस्थापक अभिजित दीपके यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “अकाऊंट बंद कर, नाहीतर अमेरिकेत येऊन संपवू” असा इशारा देत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा अचूक पत्ता पाठवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात भारतीय मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अभिजित दीपके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने केवळ धमकीचे संदेश पाठवले नाहीत, तर सलग फोन कॉल करून दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. “हे पेज लगेच हटव, हवे तेवढे पैसे घे किंवा भाजपमध्ये सामील हो” असा प्रस्ताव देत “नाही मानले तर अमेरिकेत येऊन संपवू” अशी गंभीर धमकी देण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने “तुझा नंबर मिळाला आहे, तुझे घर शोधायला वेळ लागणार नाही” अशी भाषा वापरत त्यांचा घराचा पत्ता देखील पाठवला. यासोबतच संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक शेअर करून त्यात सहभागी होण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचे समोर आले आहे. संभाव्य धोका ओळखून अभिजित दीपके यांनी तातडीने संबंधित नंबर ब्लॉक केला.
या सर्व संभाषणांचे स्क्रीनशॉट स्वतः अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर सार्वजनिक केले असून, त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराचा निषेध करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, “कॉक्रोच जनता पार्टी” ही मोहीम देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ सुरू करण्यात आली होती. उपहासात्मक शैलीत सुरू झालेली ही मोहीम अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर मूळ पेज बंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, “कॉक्रोच इज बँक” या नव्या नावाने पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली.
समाजमाध्यमांवर मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे धमक्या देणे, घराचा पत्ता पाठवून भय निर्माण करणे आणि दबाव टाकणे ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज