राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना भीम आर्मीचे अभिवादन

सत्यशोधक विचारांची आज देशाला गरज – अजित मोरे



फलटण,१२- : राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी संघटनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाला कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड, फलटण तालुका अध्यक्ष अजित मोरे, तालुका उपाध्यक्ष सुनील पवार यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



यावेळी बोलताना अजित मोरे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, लहानपणापासूनच जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध तीव्र चीड असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांनी अन्यायाविरोधात आयुष्यभर लढा दिला. एका ब्राह्मण मित्राच्या लग्नसमारंभात त्यांना ‘खालच्या जातीचा’ म्हणून अपमानित करण्यात आल्याची घटना त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली.


याच अनुभवातून त्यांनी समाजातील उच्च-नीच, अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायकारक प्रथांविरोधात संघर्ष उभारला. समाज परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाचा प्रसार सुरू केला.



पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि महिलांना नवे जीवन दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजात समता, शिक्षण आणि प्रगतीचा प्रकाश पसरला.


अस्पृश्यता निवारण, बालहत्या प्रतिबंध, अनाथांसाठी सुधारगृह, विधवा पुनर्विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी राबवल्या. तसेच १८७३ साली सत्यशोधक समाज ची स्थापना करून समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी मोठी चळवळ उभी केली.


“आजच्या परिस्थितीत देशाला महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची अत्यंत गरज आहे,” असे मत अजित मोरे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या