शिराळ्यात रिपब्लिकन सेनेचे तीव्र आंदोलन; संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी




शिराळा (जि. सांगली) ,दि.२२:– ॲट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने शिराळा तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दयानंद शिवजातक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळाला.


आंदोलकांनी तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या तात्काळ राजीनाम्याची ठाम मागणी केली. त्यांच्या मते, मंत्र्यांचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे, बेजबाबदार आणि बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे आहे. अशा प्रकारचे विधान जबाबदारीच्या पदावरून होणे अत्यंत गंभीर असून समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती-जमातींच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याला कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. या वक्तव्यामुळे दलित व आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.



यावेळी आंदोलकांनी तीन प्रमुख मागण्या केल्या—


संजय शिरसाठ यांनी जाहीर माफी मागावी


त्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी


आणि त्यांनी त्वरित मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा



तसेच शासनाने ॲट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली.


आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत भविष्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.



या आंदोलनात अमर माने, संदीप धुमाळ, रुपाली धनवडे, राजहंस भुजिंगे, प्रदीप माने, अमर काळे, रोहित महिंद, शुभंम साखरे, डॉ. विनोद झाडे, डॉ. दादासो मरगळे, प्रणित गाडेकर, मोहन माळी, सौरभ साखरे, अनिल माने, रोहित गाडेकर, संजय विभुते, योगेश पवार, निलेश माने, साहिल वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या