आरएसएस मुख्यालय घेराव: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राफेल आणि परराष्ट्र धोरणावर मोठे सवाल




नागपूर ,दि.२३-: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर आज काढण्यात आलेल्या “संयुक्त जनआक्रोश मोर्चा”त प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले.


आपल्या आक्रमक भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे थेट उत्तरांची मागणी केली. कथितपणे पडलेल्या राफेल विमानांच्या मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित करत, हे विमान भारतात पडले की पाकिस्तानमध्ये, तसेच संबंधित वैमानिकांचे काय झाले, याबाबत स्पष्टता मागितली.


आंबेडकर म्हणाले की देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे आणि याबाबत उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे. त्यांनी सनातनवाद्यांनाही हे प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याचे आवाहन केले.


विपक्षी पक्षांना उद्देशून त्यांनी सांगितले की आरएसएस आणि सरकारच्या दबावाला घाबरून चालणार नाही. “जेलमध्ये टाकण्याच्या भीतीने प्रश्न विचारणे थांबवू नका,” असे ते म्हणाले.


स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्यांना धमक्या देण्यात आल्या, मात्र ते ना घाबरणार ना झुकणार. “मी फकीर आहे, माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही. आयुष्यात कधी भ्रष्टाचार किंवा लाच घेतली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.



परराष्ट्र धोरणावर बोलताना त्यांनी भारताची भूमिका अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला. इराण सारख्या देशांनी कठीण काळात भारताला साथ दिल्याचे सांगत, अशा मित्र देशांशी निष्ठा ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


तसेच इस्त्राईल संदर्भात भारताला त्यांच्या मदतीची गरज नसून भारतीय लष्कर सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले. रशिया नेही अनेकदा भारताला मदत आणि गुप्त माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.


आंबेडकर यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध कोणत्याही धर्म किंवा ब्राह्मण समाजाविरोधात नसून फक्त आरएसएसच्या विचारसरणीविरोधात आहे. आंदोलनाचे चुकीचे चित्रण करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.


काँग्रेस, सीपीएम आणि इतर पक्षांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारून केंद्र सरकारला जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच असे झाल्यास आगामी निवडणुकांत भाजपला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी व्यक्त केला.


शेवटी, देशाची स्वायत्तता, परराष्ट्र धोरण आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत, पुढील १०-१५ दिवसांत नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे मागा, असे त्यांनी जनतेला सांगितले.


भाषणाचा शेवट “जय हिंद, जय भारत” या घोषणांनी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या