फलटण (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार (जीआर) राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून पात्र नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव राजेंद्र गायकवाड (आप्पा) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मा. पालकमंत्री साहेब (सातारा) श्री. शंभूराज देसाई साहेब यांना निवेदन दिले.तसेच सदरचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातही देण्यात आले आहे हे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती ऋतूजा कदम यांनी स्वीकारले..
फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो गरीब, गरजू आणि सर्वसामान्य कुटुंबे अनेक वर्षांपासून शासकीय व गायरान जमिनीवर निवासी हेतूने वास्तव्यास आहेत. मात्र, अद्याप त्यांना मालकी हक्क, नियमितीकरण किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. यामुळे या कष्टकरी नागरिकांमध्ये सतत भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडे संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
शासन निर्णयाची अंमलबजावणी: २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाची (GR) जिल्ह्यात तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
तातडीने सर्वेक्षण: गावपातळीवर निवासी अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण तातडीने सुरू करावे.
संयुक्त छाननी व यादी: नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महसूल प्रशासनामार्फत संयुक्त छाननी करून पात्र नागरिकांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात यावी.
विनामूल्य मोजणी: भूमी अभिलेख विभागामार्फत या जमिनींची विनामूल्य मोजणी करून देण्यात यावी.
भोगवटादार वर्ग-२ हक्क: पात्र ठरलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना शासन निर्णयानुसार निवासी अतिक्रमणे नियमित करून 'भोगवटादार वर्ग-२' चे मालकी हक्क देण्यात यावेत.
अन्याय निवारण: प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने चोख दक्षता घ्यावी.
शासन निर्णयातील ठरवून दिलेल्या मुदतीनुसार ही सर्व कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, या निवेदनावर काय दखल घेतली जात आहे, याचा लेखी अभिप्राय प्रशासनाने तात्काळ द्यावा, असेही संघटनेने म्हटले आहे.
या निवेदनावर कामगार संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव राजेंद्र गायकवाड, 'साम्राज्य नायक'चे संपादक प्रशांत सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज