सातारा | २१ मार्च २०२६
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उपमुख्यमंत्री श्री .एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार महेश शिंदे आता नेमके कोणाचे? असा पेच राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. स्वतःच्याच पक्षातील सदस्यांची 'फोडाफोडी' केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होत असल्याने शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
कौटुंबिक राजकारण की राजकीय तडजोड? आमदार महेश शिंदे हे अधिकृतपणे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत. मात्र, त्यांच्या पत्नीने चक्क भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणूक लढवली. आमदार शिंदेंनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून पत्नीला निवडून आणले आणि आता त्यांच्या पत्नी सौ.प्रिया महेश शिंदे ह्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत तर उपाध्यक्ष पदी श्री. राजू भोसले हे निवडून आले आहेत
स्वतःच्याच पक्षाला धक्का: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या विजयासाठी आमदार शिंदेंनी स्वतःच्याच पक्षातील दोन महत्त्वाच्या सदस्यांना फोडल्याचा आरोप आहे.
हनुमंत जगदाळे (कुमठे गट)
सारिका फाळके (सातारा रोड गट)
या सदस्यांनी ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात मोठी नाराजी आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आपल्याच आमदाराने पक्षाच्या सदस्यांची फोडाफोडी केल्याने आता पालकमंत्री काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे
भाजपचा 'सायलेंट' पाठिंबा - या सर्व प्रकारात भाजपने उघडपणे काहीही न बोलता अध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले आहे. यामुळे 'महायुती'मध्ये साताऱ्यात तरी शिवसेनेचे वर्चस्व कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील इतर निष्ठावान सदस्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची तक्रार थेट उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आता प्रश्न उपस्थित होत आहेत:
"आमदार महेश शिंदे यांना स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी पक्षाचे हित बाजूला ठेवणे महागात पडणार का? आणि उपमुख्यमंत्री अशा 'बंडखोर' आमदारावर शिस्तभंगाची कारवाई करणार की महायुतीचा धर्म म्हणून गप्प बसणार?" याकडे सर्व सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे..

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज